- चेतन गावडे सोशल वेल्फेअर आणि गावडे पार्क मित्र मंडळाचा उपक्रम..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने कोविडच्या नियमांमुळं सलग दुसऱ्या वर्षी गणेशमूर्ती विसर्जन नदी व तलावांमध्ये करण्यास बंदी घातल्याने अनेक भक्तांचा हिरमोड झाला. मग बाप्पाला भावपूर्ण निरोप कुठ द्यायचा? असाही अनेकांना प्रश्न पडला. ही अडचण लक्षात घेऊन चिंचवडच्या चेतन गावडे सोशल वेल्फेअर आणि गावडे पार्क मित्र मंडळाने परिसरात ‘सेवा बाप्पाची लाख मोलाची’ या उक्तीनुसार गणेश मूर्ती संकलन केंद्र आणि विसर्जन हौदाची भाविकांना सोय करून दिली.
गेल्या दहा दिवसांपासून हा उपक्रम चिंचवड परिसरातील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, गोलांडे इस्टेट, गोलांडे कॉलनी (राम मंदीराजवळ), गावडे पार्क, श्रध्दा गार्डन, येथे संपन्न झाला. मूर्ती संकलन केंद्र आणि विसर्जन हौदाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने भाविकांनी गणेशाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन केले.
याबाबत माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते चेतन गावडे म्हणाले, करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी शहरातील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदा करोनासारख्या आजाराचा आपण सामना करीत असून त्याचा प्रादुर्भाव होता कामा नये; यासाठी प्रभागातील नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन घरीच करण्याचे आवाहन केलं होतं. घरच्या बाप्पाला निरोप देताना गर्दी न करता मृर्तीचे हौदात विसर्जन करून मूर्ती संकलन पद्धतीचा अवलंब केला. निर्माल्य एका वेगळ्या पिशवीत काढून ते निर्माल्य कुंडीत जमा केले. गेली दहा दिवस हा उपक्रम सुरु होता. त्यासाठी प्रभागात चार हौदाची सोय करण्यात आली होती. तब्बल बाराशे गणेशमूर्तीचे संकलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी मोठे कष्ट घेतले. या गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले, अशी माहिती गावडे यांनी दिली.