न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२१) :- डांगे चौकातील दारूच्या दुकानातून दारू पिऊन बाहेर पडलेल्या तरुणाच्या डोक्यात अज्ञात वस्तूने मारून त्याचा खून करण्यात आला. गुरुवारी (दि. २३) रोजी एकाने याबाबत तरुणाच्या वडिलाना फोन करून तुमचा मुलगा डांगे चौक येथे पडला असून त्याच्या नाका तोंडातून रक्त येत असल्याचे सांगितले.
पोलिसांनी तरुणाला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदन अहवालात तरुणाच्या डोक्यात अज्ञात वस्तूने मारल्यामुळे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
रोहन दिलीप कांबळे (वय ३०, रा. धायरी, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाचे वडील दिलीप शंकर कांबळे (वय ६०) यांनी गुरुवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.