न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. १४ जाने.) :- रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या रनेथॉन ऑफ होप-२००९ या स्पर्धेस निगडी, प्राधिकरणातील सेक्टर २७ येथील महापौर बंगल्यासाठी राखीव असलेल्या मैदानातून रविवारी (दि. १३) रोजी सकाळी पावणेसहा वाजता सुरुवात झाली. या स्पर्धेत सुमारे सात हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. आदित्य आर याने एक तास सतरा सेकंदांत मॅरेथॉन पूर्ण करुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
स्पर्धेच्या माध्यमातून निरामय आरोग्याचा संदेश देण्यात आला. स्पर्धेची सुरुवात सिस्का एलईडीचे उपाध्यक्ष अजय मेहरा व ब्रीज स्टोनचे कार्यकारी संचालक अजय सावेकरी यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी, अण्णारे बिरादार, सचिव जगमोहन सिंग, डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर डॉ. शैलेश पालेकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत एकाच दिवशी १२ वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यती झाल्या. दुसऱ्या टप्प्यात लहान मुलांच्या स्पर्धेला माजी उपमहापौर शैलजा मोरे, राजू मिसाळ यांनी झेंडा दाखविला. ही स्पर्धा १२ ते १४ आणि १४ ते १६ या दोन वयोगटात झाली. याशिवाय अन्य वयोगटातही स्पर्धा झाली.











