न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जाने.) :- झोपडपट्टी निर्मूलन व पुर्नवसन विभागांतर्गत वाटप केलेल्या सदनिकांचा मिळकत कर वाजवी करण्याबाबतचा निर्णय घ्यावा. पुणे, मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टयांचे पुर्नवसन एसआरए स्किम राबवाव्यात, महापालिकेमधील वर्ग १ ते वर्ग ४ कर्मचाऱ्यांचा रिक्त अनुशेष भरावा, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांना केल्या.
रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या राज्यस्तरिय अधिवेशनाकरिता ते शहरात आले होते. तत्पूर्वी चिंचवड येथील एमआयडीसी गेस्ट हाऊस येथे त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मागासवर्गीय अनुशेष भरती व शहरातील एसआरए स्किमची माहिती महापालिका अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक तुषार हिंगे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, अण्णा बोदडे, चंद्रकांत इंदलकर, स्मिता झगडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी, प्रशासन अधिकारी राजेश आगळे, रिपाइंचे शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन, लक्ष्मण गायकवाड, बाळासाहेब भागवत, अजीज शेख आदी उपस्थित होते.











