न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जाने) :- सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल व भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात मकरसंक्रांत, भोगी आणि भूगोलदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथम सूर्यपूजा आणि सुगडपूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे, सर्व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका हर्षा बाठिया यांनी विद्यार्थ्यांना भोगी व मकरसंक्रांत सणाचे महत्त्व सांगून आपल्या भारतीय संस्कृतीविषयी माहिती दिली. गीता येरूणकर यांनी विद्यार्थ्यांना भूगोलदिनाची माहिती दिली, तसेच मकरसंक्रांतीचे वैज्ञानिक महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शाळेच्या शिक्षिका जयश्री गुरव, कविता मुदलियार, ललिता गिल यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रांतातील संक्रातीच्या पद्धती, वैज्ञानिक महत्त्व, पतंग, तसेच काळ्या रंगाचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ अशा शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता केली.
दरम्यान, शाळेत पतंग बनविणे, हलव्याचे दागिने बनविणे, भेटकार्ड बनविणे आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांना वाव देत एकाहून एक सरस पतंग, हलव्याचे दागिने आणि भेटकार्ड बनवीत आपले कौशल्य दाखविले. पतंग आणि भेटकार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी फेसबुक, व्हाट्सअप्प, टिकटॉक, यु ट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटर असा संपूर्ण सोशल मीडियाच उभा केला होता. विद्यार्थ्यांच्या या कौशल्याला शिक्षिकांनी कौतुकाची थाप देत प्रोत्साहन दिले.











