- आ. लांडगे व आ. जगताप यांची माजी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२१) :- . आ. लांडगे व आ. जगताप यांनी शहरात मनमानी व हुकूमशाही पद्धतीने महापालिकेत हस्तक्षेप करत अनेक नगरसेवकांना त्रस्त केले. त्यामुळे आपल्याच पक्षातील काही नगरसेवक यांच्या कारभारावर नाराज आहेत. त्यामुळे आपण येत्या महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपाच्या संदर्भात लांडगे गट किंवा जगताप गटाचा समर्थक, नातेवाईक किंवा स्नेही म्हणून निर्णय न घेता भाजपच्या मेहनती सर्वसामान्य सच्च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.
पिंपरी -चिंचवड महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकवण्याचा आपल्या सर्वांचाच मानस आहे. पण, गेल्या ५ वर्षांमध्ये शहरातील भाजपचे दोन आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या अनेक चुकीच्या कामांमुळे येत्या निवडणुकांमध्ये भाजपाला याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. या आमदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे खापर विरोधी पक्ष व जनता महापालिकेतील आपल्या नगरसेवकांवर फोडणार हे निश्चित आहे
राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांकडून मी भाजपच्या आमदारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजप पक्ष सोडणार असल्याची चर्चा सध्या शहरात चालू आहे. पण, मी भाजपच्या कोणत्याही आमदाराच्या गटातील म्हणून नव्हे तर भाजपचा एक सच्चा शिलेदार म्हणून काम करतो आहे. ज्या दोन आमदारांनी चुकीची कामे केली आहेत ते कदाचित स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पक्षाचा त्याग करू शकतात, तशी शक्यताही सध्या वर्तवली जात आहे. पण, मी भाजपच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजकारण करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कायम पक्षाशी एकनिष्ठ राहणार असून पक्षाचे होणारे नुकसान पाहू शकत नाही. हे दोन्ही आमदार वेळ प्रसंगी पक्ष बदलतील. परंतु, नवीन कार्यकर्ता केव्हा ही पक्ष बदलू शकत नाही, असे नगरसेवक कामठे यांनी पत्रात म्हटले आहे.
















