- पालिका आयुक्तांचा पुढाकार; महिन्याच्या आत फैसला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी तक्रार निवारण दिन साजरा केला जाणार आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कामकाजावरून वादाचे प्रसंग उद्भवतात. तक्रार अर्जावर तसेच निवेदनावर आवश्यक ती कार्यवाही संबंधित विभागामार्फत होणे अपेक्षित आहे. मात्र, संबंधित विभागाकडून अशा तक्रारींवर कार्यवाही करताना कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जातो. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यांनी कर्मचारी तक्रार निवारण दिन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास, त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस तक्रार निवारण दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुक्त असतील. सकाळी दहा वाजता आयुक्तांच्या कक्षामध्ये हा कार्यक्रम सुरू होईल.
ज्या कर्मचाऱ्यांची तक्रार असेल त्यांनी दर महिन्यांच्या १५ तारखेपर्यंत अर्ज दोन प्रतीत कामगार कल्याण विभागाकडे पाठविणे आवश्यक आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर ज्या विभागांशी संबंधित तक्रार आहे, त्या विभागाच्या विभागप्रमुखांकडे संबंधित अर्ज पाठविण्यात येईल. त्यांना पोचपावती देण्यात येईल. तक्रार निवारण दिनाच्या दिवशी ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे. त्या विभागाच्या विभागप्रमुखांनी उपस्थित रहावे. अर्जदारांच्या तक्रारीवर नियम, विभागाची भूमिका, तरतुदी या बाबींचा विचार करून तक्रार निवारण प्रमुख योग्य निर्णय देतील. अर्जदाराला अंतिम उत्तर तक्रार निवारण दिनानंतर शक्य तितक्या लवकर एक महिन्याच्या आत देण्यात येईल, असे आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.












