- आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२१) :- राज्य परिवहन महामंडळाचे विलिनीकरण राज्य शासनात करण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून एस. टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे वल्लभनगर आगारातील बससेवा ठप्प आहे. वल्लभनगर आगारातील आंदोलन करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले.
या कारवाईमुळे आंदोलकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. एस. टी. कर्मचाऱ्यांचे वेतन मुळातच कमी आहे. त्यामुळे कुटुंबांची गुजराण कशी करावी, असा प्रश्न एस. टी. कामगारांपुढे आहे. सध्या मिळणाऱ्या पगारात घरसंसार चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे कर्ज कढून स्वतःचा उदरनिर्वाह करावा लागतो.
या परिस्थितीचा विचार करून एस. टी. कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करून सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, यासाठी ८ नोव्हेंबरपासून एस. टी. कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप पुकारला आहे. या संपात वल्लभनगर आगारातील २९५ कर्मचारी सहभागी झाले आहेत. वल्लभनगर आगारात काम करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश शुक्रवारी एस. टी. प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवरून काढण्यात आले आहेत.












