- कार्तिकी यात्रेसाठी सरकारकडून आणखी निर्बंध शिथिल..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२१) :- कोरोना नियमांचे पालन करून १५ नोव्हेंबरपासून सुरू होणारी कार्तिकी यात्रा भरवण्यास परवानगी दिली असताना आता ज्येष्ठ आणि गर्भवतींनाही विठ्ठूरायाचे दर्शन घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ऐनयात्रेच्या तोंडावर निर्बंध आणखी शिथिल केल्यामुळे वारकरी आणि विठ्ठलभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि इतर नियमांमुळे गेल्या दीड वर्षात पंढरपूरमध्ये सहा मोठय़ा यात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. या काळात कोटय़वधी भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही. त्या पार्श्वभूमीवर, तब्बल २० महिन्यांनंतर आता विठुरायाची पंढरी वारकऱयांनी गजबजणार आहे. प्रांताधिका-यांनी सादर केलेला प्रस्ताव आणि मंदिर समितीने यात्रा भरवण्यास अनुकुलता दाखवली. त्यामुळे पंढरपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कार्तिकी यात्रा भरवण्यास परवानगी दिली आहे.
वारकरी संप्रदायासाठी आषाढी-कार्तिकी हा दिवाळी सणाएवढाच महत्त्वाचा असतो. त्यात सरकारने आता ६५ वर्षांवरील वारकरी आणि भाविकांसह गर्भवतींनाही विठुरायाच्या दर्शनाची परवानगी दिली आहे. याबाबतचे परिपत्रक सरकारने बुधवारी काढले.












