न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२१) :- भारतीय स्वातंत्र लढ्याविषयी चूकीचे वक्तव्य करणा-या कंगना राणावतचे आणि तिचे समर्थन करणा-या विक्रम गोखले यांचे चित्रपट पिंपरी चिंचवड शहरात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिला.
तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास माहित नसणा-या बालिश कंगना राणावतचे समर्थन करणा-या विक्रम गोखले यांचाही केंद्र सरकारने पुरस्कार देऊन गौरव करावा अशी उपरोधिक टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. १७ नोव्हेंबर) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राणावत व गोखले यांचा निषेध करीत त्यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले आणि त्यांच्या प्रतिमेवर शाई फेकण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव गौतम आरकडे, पर्यावरण विभागाचे प्रदेश अध्यक्ष अशोक मोरे, पिंपरी चिंचवड युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी महापौर कविचंद भाट आदी उपस्थित होते.