- पालिकेकडून ५०० रूपये दंड; वैद्यकीय उपचारांचे दर देखील वाढले..
- सर्वसाधारण सभेत प्रस्तावाला मान्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाळीव प्राण्याची संख्या वाढत आहे. अनेक नागरिक घरामध्ये कुत्री, मांजर असे प्राणी पाळतात. सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर पाळीव प्राण्याने शौच केल्यास त्यांच्या मालकांस ५०० रूपये दंड केला जाणार आहे. या प्रस्तावाला आज गुरुवारी (दि. १८) रोजी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे.
शहरातील बहुतांश नागरिक पाळीव प्राण्यांना सकाळी व सायंकाळी बाहेर फिरण्यासाठी घेऊन जातात. हे प्राणी रस्त्यावर व शहरातील सार्वजनिक ठिकाणी शौच करतात. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी पाळीव प्राण्यांनी रस्त्यावर शौच केल्यास त्यांच्या मालकांवर दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.
याशिवाय पालिकेच्या रुग्णालयात खासगी पाळीव प्राण्यांच्या (कुत्री, मांजरी) वैद्यकीय उपचारासाठी वीस रुपयांचा केस पेपर काढावा लागणार आहे. त्यांच्या ओपीडीसाठी दीडशे, एक्स-रेसाठी अडीचशे, सोनोग्राफीला साडेतीनशे, शस्त्रक्रियेसाठी चारशे रुपये मोजावे लागणार आहेत. कुत्र्याच्या नसबंदी शस्त्रक्रियेसाठी एक हजार दोनशे, तर मांजरासाठी तेराशे रुपये शुल्क लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.