- वाढीव लीजमुळे उडाली खळबळ; आक्षेप नोंदवण्याबाबतचा ठराव मंजूर..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२१) :- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने प्रॉपर्टी होल्डर धारकांना मोठ्या प्रमाणावर लीज (भाडे) आकारण्यात आले. प्रशासनाच्या वतीने प्रचंड प्रमाणावर भाडे आकारण्यात आल्याने लीज धारकांमध्ये माेठ्या प्रमाणावर खळबळ माजली आहे. अग्रवाल समाज येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते लीजधारकांनी बोर्ड प्रशासनाकडे आक्षेप नोंदवावा असा निर्णय घेण्यात आला.
खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये मधील लीजधारकांना लीज (भाडे) भरण्याच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. बोर्ड प्रशासनाकडून भाडेतत्त्वावर लीजधारकांनी जागा घेतल्या आहेत. या भाड्यापोटी पूर्वीच्या भाड्याव्यतिरिक्त अनेक पटीने भाडे आल्याने लीजधारकांत प्रचंड प्रमाणावर खळबळ उडाली आहे. अग्रवाल समाज येथे लिजधारकांची बैठक संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्षस्थान दीपक अगरवाल, भारतीय जनता पार्टीचे खडकी मंडळ अध्यक्ष धर्मेश शाह यांनी भूषविले. यावेळी सर्व लीजधारकांनी सर्वप्रथम बोर्ड प्रशासनाकडे आक्षेप नोंदवावा असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. लीजधारकांच्या लीज बाबत असलेल्या प्रश्नांची अॅड. सुनील अग्रवाल यांनी समाधानकारक उत्तरे दिले. प्रशासनाच्या वतीने ३१ डिसेंबर पर्यंत लीज भरण्याचे स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून लीज न भरल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बैठकीचे सूत्रसंचालन धीरज गुप्ता तर आभार प्रदर्शन डॉ. मालोजी गादेवार यांनी केले. याप्रसंगी अँड. मुकेश शाह, सूरजभान अग्रवाल, राजेश अग्रवाल, किरण जाधव, लक्ष्मीकांत खंडेलवाल, लक्ष्मण कामाजी, प्रमोद बन्सल तसेच मोठ्या प्रमाणावर लिजधारक उपस्थित होते.
कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने अग्रवाल समाज खडकी २०१७-१८ ला ३ हजार रुपये भाडे आकारण्यात आले होते, तर २०१८-१९ यावर्षी ३२ हजार तसेच २०१९-२० आणी २०२०-२१ या दोन वर्षांसाठी ७२ हजार भाडे आकारण्यात आले. ७२ हजार रुपये बोर्ड प्रशासनाकडे भरल्यानंतर सुमारे ४ महिन्यांतच एरियस आणि डॅमेज म्हणून तब्बल ११ लाख रुपयाची नोटीस आली असल्याचे दीपक अग्रवाल यांनी सांगितले. तसेच बोर्ड प्रशासनाच्या वतीने घरांसाठी २०२०-२१ ला ५ हजार ५०० रुपये भाडे असताना तब्बल ७६ हजार रुपये भरण्याची नोटीस आली असल्याचे अग्रवाल म्हणाले. अनेक लीजधारकांना कोणत्या आधारावर लीज वाढवण्यात आली असल्याचा प्रश्न अग्रवाल यांनी व्यक्त केला.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील लीजधारकांना पाठविण्यात आलेल्या नोटीसबाबत कोणत्याही प्रकारच्या हरकती असल्यास समक्ष भेटून शंका दूर करण्यात येतील असे बोर्डाचे सीईओ प्रमोद कुमार सिंग यांनी बोर्डाच्या बैठकीत स्पष्ट केले होते.