न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२१) :- लोकाभिमुख संकल्पनेतून मंडळस्तरावर प्रशासनाच्या आयोजित फेरफार अदालतीद्वारे पिंपरी – चिंचवड शहरात एकूण ८४ नोंदी करण्यात आल्या आहेत.
या फेरफार अदालतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून जन प्रलंबित, साध्या, वारस, तक्रारी, फेरफार नोंद निर्गत करण्याचे काम गत वर्षभरापासून सुरू आहे. बुधवारी (दि. २४) घेण्यात आलेल्या फेरफार अदालतीमध्ये एकाच दिवसात ३ हजार ३६१ नोंदी निर्गत करण्यात आल्या.
नोंदी निर्गतीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी ऑक्टोबर २०२० पासून प्रत्येक मंडळस्तरावर संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यात ९८ मंडळ मुख्यालयात झालेल्या फेरफार अदालतीत शेतकरी, खातेदार यांनी सहभागी होत चांगला प्रतिसाद दिला. बुधवारी पार पडलेल्या फेरफार अदालतीद्वारे पिंपरी चिंचवड ८४, हवेली तालुक्यात ३१५, पुणे शहर ११, शिरुर २७०, आंबेगाव १६३, जुन्नर २३१, बारामती ७७६, इंदापूर २०४, मावळ २४१, मुळशी १३४, भोर १११, वेल्हा ४०, दौंड १९४, पुरंदर १७० आणि खेड तालुक्यात ४१७ अशा एकूण ३ हजार ३६१ फेरफार नोंदी निर्गतीचे काम पूर्ण करण्यात आले तर आतापर्यंत पुणे जिल्ह्यात तब्बल १० लाख नोंदी घेण्यात आल्या असून त्यापैकी ९ लाख ७३ हजार नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रलंबित तक्रार प्रकरणांची संख्या ४ हजार १७३ इतकी असून हे कामकाज पूर्ण करून निर्गत करण्याचे नियोजन आहे. त्याबाबतच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.












