- केवळ दोन जणांकडूनच तब्बल सातशे हरकती; निवडणूक विभागाचा डोक्याला हात?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२२) :- महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रारूप प्रभाग रचना हरकतींच्या शेवटच्या दिवशी सुमारे साडेपाच हजार हरकती आल्या आहेत. प्रभाग चऱ्होली, चोविसावाडी वडमुखवाडी, भोसरी गावठाण, गवळीनगर, शीतलबाग या प्रभागांच्या सर्वाधिक हरकती असून गावांच्या नैसर्गिक सीमा फोडल्याचे आक्षेप सर्वाधिक आहेत.
पिंपरी – चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना १ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली. १३९ नगरसेवक संख्येसाठी तीन सदस्यांचे ४५ तर चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. भौगोलिकदृष्ट्या प्रभाग क्रमांक पाच चऱ्होली सर्वांत मोठा तर प्रभाग क्रमांक सात सॅण्डविक कॉलनी, रामनगर सर्वांत छोटा प्रभाग आहे.
पहिल्या आठवड्यात हरकतींचे प्रमाण कमी होते. शेवटच्या दिवशी हरकतींचा पाऊस पडला आहे. गावठाणातील रेल्वेमार्ग, रस्ते, नदी व नाल्याच्या नैसर्गिक सीमा ओलांडून, एकसंध भाग तोडल्याबाबतचे आक्षेप सर्वाधिक नोंदविण्यात आले आहेत. या हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांची राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक पाच आणि आठ या दोन प्रभागांवर सर्वाधिक हरकती आल्या आहेत. प्रभाग चऱ्होली, चोविसावाडी, वडमुखवाडी, काळजे वस्ती, पठारे मळा, बुर्डे वस्ती व ताजणे मळा या भागांचा समावेश आहे. हा प्रभाग नैसर्गिकरीत्या झाला नाही. यामधील गजाननगर, भारतनगर, गणेशनगर आदर्शनगर, भारतमातानगर, कृष्णानगर हा भाग प्रभाग क्रमांक सात किंवा आठला जोडण्याची मागणी केली. यासाठी सातशे हरकती आल्या आहेत. केवळ दोन जणांनी सातशे हरकती आणून दिल्या आहेत.
महापालिका प्रभाग क्रमांक आठसाठी मोठ्या प्रमाणावर हरकती आल्या आहेत. यामध्ये भोसरी गावठाण, गवळीनगर, खंडोबामाळ व शीतलबाग आदींचा समावेश आहे. त्यातील गव्हाणे वस्ती भाग अखंड ठेवावा, अशी मागणी केली आहे. यासाठी दोनशेहून अधिक अर्ज आले आहेत. याव्यतिरिक्त प्रभाग क्रमांक ३ (जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी), प्रभाग क्रमांक ११ (गवळीमाथा, बालाजीनगर), प्रभाग १४ (यमुनानगर, फुलेनगर), प्रभाग १७ (वल्लभनगर, संत तुकारामनगर), २० ( काळभोरनगर अजंठानगर), ३६ (डांगे चौक, गणेशनगर), ३७ (ताथवडे, पुनावळे), ४१ (पिपळे गुरव गावठाण) आणि ४२ (कासारवाडी, फुगेवाडी) या प्रभागांवर हरकती आल्या होत्या.
महापालिकेतील आजी – माजी नगरसेवकांनी हरकती घेतल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी अधिक हरकती घेतल्या आहेत. तर त्यापाठोपाठ चिचवड आणि पिपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी – माजी नगरसेवकांनी हरकती घेतल्या आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्याची ताकद असणारे भाग तोडल्याची कार्यकर्त्यांनी हरकत घेतली आहे.
- नैसर्गिक हद्दी, वर्णन, नावे, आरक्षण याप्रमाणं वर्गीकरण केले जाईल. पुढील दोन दिवसात वर्गीकरणाचे काम पूर्ण केले जाईल. या हरकती राज्य निवडणूक आयोगाला पाठविल्या जातील. आयोगाकडून या हरकती प्राधिकृत अधिकारी अनिल कवडे यांना पाठविल्या जातील. एकाच प्रकारची मागणी असलेल्या हरकतींचा एक गठ्ठा केला जाईल. त्यांना एकाचवेळी सुनावणीसाठी बोलविले जाईल.
– मा. बाळासाहेब खांडेकर सहायक आयुक्त, निवडणूक विभाग…