न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची तहकूब सर्वसाधारण सभा आज सोमवार (दि. ४) रोजी पार पडली. या सभेत टाळगाव, चिखली येथील संत तुकाराम महाराज संतपीठ उभारणीच्या कामास मंजुरी, भोसरीतील रुग्णालयाचा खाजगीकरणाचा घाट व आदी महत्वाचे विषय चर्चेसाठी होते. मात्र, सत्ताधारी भाजपने या सभेत कुरापती काढून सभेस दिशाहीन केले. तसेच यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिकाही संशयास्पद वाटत होती. सत्ताधारी भाजप व महापौर राहुल जाधव यांच्या कृतीने महापालिकेच्या गरिमेस धक्का पोहचला असल्याचा आरोप, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे व मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
संतपीठाचा प्रस्ताव मंजूर करून संचालकपदी वारकरी सांमप्रदायिक मंडळींचा समावेश करणे आवश्यक होते. संचालक मंडळावर महापौर, गटनेते, पदाधिकारी यांचा सहभाग अपेक्षित होता. मात्र कोणालाही विश्वासात न घेता, आम्हाला बोलू न देता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या विषयांवर मतदान घेणे गरजेचे होते. झालेल्या गोंधळामुळे शंकेला जागा निर्माण होत आहे. सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रवादीने ठरवून गोंधळ घातला असल्याचा आरोप शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केला आहे.
मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले की, संतपीठामध्ये स्थानिक नगरसेवक, वारकरी तज्ञांचा समावेश करून घ्यावा, अशी मनसेची मागणी आहे. भोसरीतील महापालिकेचे हॉस्पिटल खाजगी तत्वावर चालविण्यास देण्यास मनसेचा तीव्र विरोध आहे. आर्थिक निकष ठरवून सर्वांनाच मोफत उपचार देणे गरजेचे होते. ३० वर्षांसाठी हे हॉस्पिटल चालवायला दिले जाणार आहे. कोणाचेही नियंत्रण तेथे राहणार नसल्यामुळे, मनमानी कारभार चालणार आहे. आज सभेत झालेला गोंधळ म्हणजे लोकशाहीचा गळा घोटला असल्याचा, आरोप चिखले यांनी केला आहे.


















