- आयुक्तालयाकडून सेवा अॅपची मोहीम; पोलिसांचे केले स्टिंग ऑपरेशन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२२) :- नागरिकांना पोलिसांकडून मिळणारी वागणूक तपासण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी सेवा अॅप हा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांना येणारे अनुभव आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डमी तक्रार देऊन घेतला. यामध्ये चार ठिकाणी पोलिसांना चांगला अनुभव आला. नागरिकांना योग्य वागणूक आणि सेवा देणाऱ्या चार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
हिंजवडीचे सहाय्यक निरीक्षक राम गोमारे, चाकणचे उपनिरीक्षक संतोष लांडे, निगडीचे पोलीस शिपाई वाघमारे, पिंपरीचे पोलीस शिपाई लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस ठाणे, चौकी येथे तक्रार देण्यासाठी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांना पोलिसांकडून येणारा अनुभव आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी ५ फेब्रुवारी २०२१ पासून सेवा अॅप प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे. सामान्य नागरिक, तक्रारदार हे पोलीस ठाण्यात अथवा चौकीला गेल्यावर त्यांना कशी वागणूक मिळते याबाबत आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हा उपक्रम केला आहे. पोलीस नागरिकांना कशी वागणूक देतात हे पाहण्यासाठी आयुक्तालयातील वरिष्ठ अधिका-यांनी डमी तक्रार पोलीस ठाण्यात पाठवली. त्या तक्रारीवर पोलिसांनी कशी प्रतिक्रिया दिली. आलेल्या तक्रारीवर किती गांभीयनि कार्यवाही केली. या सर्व बाबी जाणून घेण्यात आल्या. यामध्ये तक्रारदारांना चांगली वागणूक देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.


















