न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२२) :- पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे पुन्हा एकदा त्यांच्या वेशांतर करून केलेल्या कारवाईमुळे चर्चेत आले आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि मुंबई पोलीस दलातील विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा वापर करून खंडणी उकळणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
शनिवारी (२६ मार्च) रात्री साडेनऊच्या सुमारास एका हॉटेलमधून रोशन बागुल या खंडणीखोर आरोपीला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर करून बेड्या ठोकल्या. संबंधित आरोपी हा कृष्ण प्रकाश आणि विश्वास नांगरे पाटील यांचा विश्वासू असल्याचं सांगत आम्ही त्यांचे अनेक जमिनीचे प्रकरण निकाली लावली आहेत, असा दावा करायचा. तो स्वतः ला सायबर क्राईमचा अधिकारी देखील म्हणवत होता.
आरोपी रोशन बागुल अशाप्रकारे धमकावून सर्वसामान्य नागरिकांकडून खंडणी उकळायचा. शनिवारी रात्री फिर्यादी विसेन्ट जोसेफ यांनी पैसे घेण्यास आरोपीला बोलावले होते. तेव्हा, वेषांतर केलेल्या कृष्ण प्रकाश यांनी आरोपीला रंगे हाथ पकडले. या प्रकरणी मुख्य आरोपी रोशन बागुल, गायत्री बागुल, पूजा माने यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी विसेन्ट जोसेफ यांनी देहूरोड पोलिसात फिर्याद दिली. प्रसारमाध्यमांना घेऊन कारवाई केल्याने यावर प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.