न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२२) :- कोणत्याही कामगार संघटनांची मागणी नसताना केंद्र सरकारने प्रचलित कामगार कायदे रद्द करुन चार नविन काळे कामगार कायदे केले हे रद्द करावेत या मागणीसाठी देशभरातील सर्व कामगार संघटनांनी सोमवारी आणि मंगळवारी अखिल भारतीय औद्योगिक संप पुकारला आहे.
त्यानिमित्त जिल्ह्यातील विविध भागातून विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी सकाळी पुणे विभागीय कार्यालय (कौन्सिल हॉल) येथे धरणे आंदोलनासाठी दुचाकी रॅलीने जमले.
यावेळी कामगार संघटना संयुक्त कृती समिती पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम, सिटू संघटनेचे अजित अभ्यंकर, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकले, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादी कामगार सेलचे अरुण बो-हाडे, घर कामगार संघटनेच्या किरण मोघे, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शुभा शमीम, हिंद कामगार संघटनेचे यशवंत सुपेकर, भारतीय कम्यूनिस्ट पक्षाच्या लता भिसे, आदींसह हजारो कामगार बंधू भगिनींनी पुणे विभागीय कार्यालयाच्या प्रवेशव्दारासमोर धरणे आंदोलन केले.