न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मार्च २०२२) :- दरवर्षी मार्च महिन्यात उन्हाचे चटके बसू लागतात, तर कमाल तापमानाचा पारा एप्रिलमध्ये चाळिशी गाठतो. मात्र, यंदा मार्चच्या शेवटच्या आठवडय़ातच राज्यातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांवर गेला आहे. तुलनेत पुण्यात तापमान कमी असले तरी उकाडय़ाने नागरिक हैराण झाले आहेत़.
यंदा २१ ते २४ मार्च आणि २८ ते ३१ मार्च या कालावधीत दोन उष्णतेच्या लाटा नोंदवल्या जातील, असा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. बुधवारपासून शनिवापर्यंत राज्यात पुन्हा उष्णतेची लाट सक्रिय होत असून, सध्या मुंबईसह कोकण वगळता बहुतांश भागात सरासरी कमाल तापमान ४० अंशांच्या आसपास गेले आहे.
हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्राने मंगळवारी ३६ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्राने ३३.१ अंश कमाल तापमानाची नोंद केली. ठाणे आणि परिसरातील पारा मात्र ४० च्या जवळ पोहोचला होता. ठाणे आणि परिसरातील कमाल सरासरी तापमान ३९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध जिल्ह्यांना उष्ण लाटेचा पिवळा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात ३० मार्च, १ आणि २ एप्रिल, नगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि अकोला या जिल्ह्यांत ३० व ३१ मार्च आणि १ व २ एप्रिल, अमरावती, बुलढाणा ३० आणि ३१ मार्च, चंद्रपूर ३१ मार्च, नागपूर ३० मार्च या कालावधीत उष्णतेची लाट तीव्र जाणवेल. मार्च महिन्यातच राज्याचा पारा सरासरी ४१ अंशांवर गेल्याने यंदा मोसमी पाऊस वेळेवर येण्याची शक्यता आहे