न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२२) :- बदलीसाठी पोलिस आयुक्तांच्या नावाखाली पोलिस महिलेकडून पैसे उकळणाऱ्याला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने यापूर्वी डॉक्टर, रुग्ण व इतरही सामान्य नागरिकांनाही अशाप्रकारे गंडा घातल्याचे तपासात समोर आले. त्याच्यावर राज्यात विविध ठिकाणी २४ गुन्हे दाखल आहेत. अमित कांबळे (वय ३२, रा. कोल्हापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिला पोलिस हवालदाराने फिर्याद दिलेली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात एक फोन आला. आपण पोलिस आयुक्तालयातून पाटील बोलत असल्याचे सांगत पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक घेतले. तुमचा येथील कालावधी पूर्ण झाला असून तुमची बदली होणार आहे. तुम्हाला कुठे बदली हवी आहे, तेथे तुम्हाला नियुक्ती मिळेल, मात्र, त्यासाठी आयुक्त साहेबांना पैसे द्यावे लागतील, मला सर्व माहित आहे, मी साहेबांचा माणूस असून तुमचे काम करून देतो, असे भामटा सांगत होता.
या गुन्ह्याचा तपास सुरु असताना तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी कोल्हापुरातील शाहूपुरी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. एमआयडीसी भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.