- नो पार्किंगमधील वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२२) :- महापालिका व वाहतूक पोलिसांनी शहरात पार्किंग पॉलिसी लागू केली आहे. त्यानुसार नो पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीस २३६ रुपये व मोटारीस ४७२ रुपये दंड आकारला जाणार आहे. वाहन ताब्यात घेण्याच्या कारवाईसाठी टोइंग व्हॅनच्या ठेकेदाराला दरमहा १ लाख ८५ हजार रुपये शुल्क दिले जाणार आहे. उर्वरित रक्कम पोलिस विभागाकडे वर्ग केली जाणार आहे, त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची पहिली सभा मधुकरराव पवळे सभागृहात झाली. या वेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
पालिकद्वारे १ जुलै २०२१ पासून सुरू झालेली पार्किंग पॉलिसी वाहतुक पोलिसांचे सहकार्य न मिळाल्याने अचानक गाळण्यात आली. ती पुन्हा दमाने संपूर्ण शहरात सुरू करण्यात येत आहे. कारवाईसाठी पालिकेकडून वाहतूक पोलिसाना टोईंग व्हॅन उपलब्ध करून दिले आहेत. नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पालिका पावती पुस्तक छापून देणार आहे. दुचाकीचालकांकडून २३६ रुपये व मोटारचालकांकडून ४७२ रुपये दंड वसूल केला जाणार आहे.
जमा होणार दंड दररोज महापालिकेच्या कोषागारात भरला जाईल. नो पार्किंगमधील वाहने टोईंग व्हॅनद्वारे उचलण्यासाठी आणि इतर यंत्रणेचा खर्च म्हणून ठेकेदाराला दरमहा १ लाख ८५ हजार रूपये अधिक जीएसटी दिला जाणार आहे. उर्वरित रक्कम पोलिसांकडे वर्ग केली जाणार आहे. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे शहराप्रमाणे पिंपरी – चिंचवडमधील रस्त्यांवरील पार्किंगमध्ये लावलेली वाहन आता वाहतूक पोलिसांकडून उचलण्यात येणार आहे. तर, पार्किंगमध्ये वाहन लावण्यास शुल्क द्यावे लागणार आहे. त्यानुसार संपूर्ण शहरात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.