- सेवानिवृत्त अधिकारी शहराचा विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल २०२२) :- नुकतेच सेवानिवृत्त झालेले पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांची पाणीपुरवठा विभागाच्या सल्लागारपदी महापालिका प्रशासनाने नियुक्ती केली आहे. लडकत यांच्या नियुक्तीला विरोध झाला होता. मात्र, त्यानंतरही आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यालाच सल्लागार म्हणून नियुक्त केल्याने पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे सक्षम अधिकारी नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
बुधवार (दि.६) रोजी महापालिका प्रशासकाची स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा झाली होती. दुसऱ्या दिवशी गुरुवार (दि. ७) रोजी स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा प्रशासक राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दोन्ही सभेत २२ विषयांना मंजुरी देण्यात आली. पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण लडकत फेब्रुवारी महिन्यामध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर विभागाचा अतिरिक्त कारभार बीआरटीएस विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे दिला आहे. त्यानंतर काही दिवसातच या विभागासाठीच लडकत यांनाच सल्लागार नेमण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला होता. त्याला काही राजकीय पुढाऱ्यांनी विरोध केला तर काहींनी समर्थन केले होते. त्यामुळे लडकत यांनी नियुक्ती होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच गुरुवारी झालेल्या सभेत प्रशासक पाटील यांनी लडकत यांची ११ महिन्यांसाठी मानधन तत्वावर सल्लागार म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे.
लडकत यांना दरमहा सुमारे ७० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. काही दिवसांपासून शहरातील विविध भागातून पाण्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. अनेक ठिकाणी पाइपलाइन फुटणे, लिकेज असणे, अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत असल्याबाबत तक्रारी येत आहे. या तक्रारींसाठी पालिकेने स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली. प्रत्येक जनसंवाद सभांमध्ये देखील पाणी प्रश्नावर सर्वाधिक तक्रारी येत आहेत. शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, भामा आसखेड पाणीपुरवठा योजना व आंद्रा धरणातून देखील पाणी घेऊन शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र हे प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हाती घेतलेल्या या प्रकल्पांना यापूर्वीच सल्लागारांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर महापालिकेचे करोडो रुपये खर्च होत आहेत, असे असतानाही आता पुन्हा या विभागासाठीच निवृत अधिकारी सल्लागार म्हणून नेमूण नवीन प्रथा प्रशासनाने सुरू केली आहे.