न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल २०२२) :- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दर महिन्याच्या आठ तारखेला महिलांना पीएमपीचा विनामूल्य प्रवास या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. या योजनेची सुरुवात शुक्रवारपासून होणार असून त्यासाठी १४ मार्गावर १९ गाडय़ांचे नियोजन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जागतिक महिलादिना निमित्त पीएमपीच्या वतीने महिलांसाठी तेजस्विनी ही बससेवा सन २०१८ मध्ये सुरू करण्यात आली. महिलांसाठी विशेष गाडय़ा असल्याने त्याला महिला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला. तेजस्विनी सेवा सुरू केल्यानंतर दहा मार्गावर ३० गाडय़ांद्वारे सेवा देण्यास सुरुवात झाली. या मार्गावर त्यानुसार प्रतिदिन २०० पेक्षा जास्त फेऱ्या होत होत्या.
या जुन्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. दर महिन्याच्या आठ तारखेला तेजस्विनी बसमधून विनामूल्य सेवा असा ठराव पीएमपी प्रशासनानेच केला होता. तर महापालिकेने जागतिक महिला दिनादिवशी महिलांना पीएमपीमधून विनामूल्य प्रवासाचा ठराव केला होता. त्यापोटी महापालिकेकडून पीएमपीला काही निधीही देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र या दोन्ही ठरावांचा पीएमपीला विसर पडला होता.