न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१२ एप्रिल २०२२) :- पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलाकडून शगुन चौकाकडे जाणारा रस्ता दुरूस्तीच्या कारणास्तव गेल्या दोन महिन्यांपासून बंद होता. तो सोमवारी (दि. ११) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पिंपरीगाव, काळेवाडी, पिंपळे सौदागर परिसरात जाण्यासाठी हा मुख्य मार्ग होता. मात्र, पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी गेल्या पन्नास दिवसांपासून हा रस्ता बंद होता.
या रस्त्यावरील वाहतूक वाल्मिकी चौकातून रिव्हर रोडमार्गे शगुन चौकाकडे वळविण्यात आली होती. यामुळे या रस्त्यावर दररोज वाहतूककोंडी होत होती. उड्डाणपुलावरून शगुन चौकाकडे जाणारा रस्ता, भाजी मंडई व मुख्य बाजारपेठेत जाणारा रस्ता बंद असल्याने व्यापारी, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
व्यापारी व नागरिकांकडून या पुलाची दुरुस्ती तत्काळ पूर्ण करण्याची मागणी केली जात होती. या मागणीचा विचार करीत दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले असून, हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा पूर्ववत करण्यात आला आहे. यामुळे व्यापारीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.