- विद्यानगरमधील घटना; तरूण गंभीर जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१२ एप्रिल २०२२) :- पत्नीला कामावर सोडविण्यासाठी दुचाकीवरून जात असताना तरुणाला चिंचवडमधील विद्यानगर येथील पदमसी बाबर चौक येथे आरोपींनी थांबवले. तुझ्याशी बोलायचे असल्याचे सांगत तरुणाला वॉशिंग सेंटरच्या मागे नेले. तुला सांगुनही तू माझे ऐकले नाही असे म्हणत तरुणाला शिवीगाळ करत कोयत्याने वार केले.
तरूण तावडीतून सुटून परशुराम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने पळू लागला. आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याना अडवले. त्यानंतर पुन्हा त्याच्या डोक्यात कोयत्याने सत्तूरने वार केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना भरदिवसा घडली.
सागर निवृत्ती बोन्द्रे (वय २५, रा. टॉवर लाईन, तळवडे, मुळ बुलढाणा) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष कळसकर, आदित्य दीपक तेली, रणजित प्रल्हाद शेडगे व आणखी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.