न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२२) :- पुणे रेल्वे स्थानकात बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तीन जिलेटीनच्या कांड्या रेल्वे स्थानक परिसरास पाडल्या आहेत. त्या निकामी करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकारामुळे रेल्वे स्टेशन परिसरात घबराट पसरली आहे.
रेल्वे स्टेशन परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन रिकामा करण्यात आला असून रेल्वे वाहतूक थांबवण्यात आलीय. बॉम्ब शोधक पथकाने मोकळ्या जागेत बॉम्बसदृश्य वस्तू निकामी करण्यासाठी नेली आहे. फलाट क्रमांक एक परिसर रिकामा करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वे स्थानक परिसराचा ते आढावा घेत आहेत. सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिकही घटनास्थळी दाखल झाले असून ते घडमोडींवर नजर ठेऊन आहेत.
“साडेदहा वाजता स्थानकावर संशयास्पद वस्तू सापडल्याची माहिती मिळाली. सध्या जिलेटिन नाही अशी माहिती आहे. पण तपासणी सुरु आहे. सध्या प्राथमिक माहिती आहे त्यामुळे जास्त सांगू शकत नाही. लोकांनी घाबरण्याचं कारण नाही,” असं पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी म्हटलं आहे.
प्रवाशांना सध्या तरी तेथे प्रवेश दिला जात नाहीय. जी संशयास्पद वस्तू आढळून आलेली ती जवळच्या मैदानात नेण्यात आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच प्लॅटफॉर्मवरील वाहतूक थांबवण्यात आलीय.