- स्वाईन फ्लूपासून बचावासाठी नागरिकांना खबरदारीचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ ऑगस्ट २०२६) :- वातावरणातील बदलामुळे तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता असून, स्वाईन फ्लूचा प्रादुर्भावही वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.
ताप, सर्दी, खोकला, घसादुखी किंवा श्वसनाशी संबंधित लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या महापालिका दवाखाना किंवा रुग्णालयात वैद्यकीय सल्ला घ्यावा. १ जानेवारी २०२६ पासून शहरात इन्फ्लुएंझा H1N1 चे १९ रुग्ण आढळले असून, योग्य उपचारांमुळे एकही जीवितहानी झालेली नाही.
नागरिकांनी वारंवार हात धुवावेत, पौष्टिक आहार घ्यावा, पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. गरज असल्यास मास्कचा वापर करावा. खोकताना किंवा शिंकताना नाक-तोंड झाकावे.
महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूसाठी आवश्यक औषधोपचार उपलब्ध ठेवण्यात आले आहेत.


















