न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ ऑगस्ट २०२६) :- गहुंजे येथे रिक्षा आडवी लावून तरुणाचे अपहरण करत त्याच्याकडील ९० हजार रुपये लुटल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट चारने सहा सराईत आरोपींना ताब्यात घेत गुन्ह्याचा छडा लावला. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि मोबाईल असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२१ ऑगस्ट रोजी रात्री गहुंजे स्टेडियम परिसरात ही घटना घडली होती. लोढा सोसायटी येथे ऑर्डर देऊन परतणाऱ्या फिर्यादीच्या दुचाकीला आरोपींनी रिक्षा आडवी लावली. त्यानंतर जबरदस्तीने रिक्षेत बसवून त्यांना मामुर्डी येथील स्मशानभूमीजवळ नेण्यात आले. तेथे मारहाण करून ९० हजार रुपये जबरदस्तीने घेऊन आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखेने घटनास्थळापासून रिक्षेचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सुरज चलवादी, दीपक भंडगे, अविनाश वानखेडे, प्रथमेश उर्फ प्रतिक कंक, विराज उर्फ सनी हिरवे आणि ईसाक काजापुरम यांना ताब्यात घेतले.
आरोपींवर यापूर्वीही दरोडा व जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील कारवाईसाठी आरोपींना तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


















