न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२२) :- पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेत कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणीसाठी ६ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली असून, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य आणि महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया राबवणारी व्यक्ती यांच्यासाठी बुधवारी (१ जून) फडके हौद येथील गुजराथी हायस्कूल येथे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
केंद्रीय अकरावी समितीच्या सदस्य सचिव मीना शेंडकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. आतापर्यंत दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत होती. मात्र, निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश प्रक्रिया लांबू नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होण्याच्या दृष्टीने ऑनलाइन अर्ज, महाविद्यालय नोंदणी ही तांत्रिक प्रक्रिया दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. त्या दृष्टीने शिक्षण विभागाने वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची माहिती होण्यासाठी सरावाची संधीही उपलब्ध करून दिली होती.
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर जाऊन आपला विभाग, दहावीच्या परीक्षेचा बैठक क्रमांक, वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती, आरक्षण हा तपशील भरायचा आहे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून शुल्क भरायचे आहे. त्यानंतर अर्ज अंतिम करून पडताळणी करून घ्यायची आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना ६ जूनपर्यंत नोंदणी करता येईल. कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ७ ते १७ जून या कालावधीत गुजराथी हायस्कूल येथे माहिती प्रमाणित करण्यासाठीचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पडताळणी करून घेणे ही महाविद्यालयाची जबाबदारी आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.