न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२२) :- शहर शिवसेनेच्या वतीने भाजपाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी एक चित्रफित बनवण्यात आली आहे. ही चित्रफित शुक्रवार दि. १० जून ते शनिवार दि. २५ जूनपर्यंत संपूर्ण शहरभर जनजागृती रथावर दुपारी ४ ते रात्री १० पर्यंत शहरातील चौकाचौकात प्रसारित करण्यात येणार आहे.
तसेच या अभियानाचा समारोप रविवार दि. २६ जून रोजी शिवसेनेच्या भव्य सभेने करण्यात येणार आहे. या चित्रफिती मध्ये महानगरपालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यात येणार आहे.
कोरोना काळात शहरातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणे बाबत देखील भाजपने भ्रष्टाचार केला. कोरोना काळात सर्वत्र उद्योग व्यवसाय ठप्प असताना महिलांना प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली महिलांच्या प्रशिक्षण शिबिराच्या कामात देखील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार भाजपाने केला. चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या संतपिठामध्ये घोटाळा, नदी सुधार योजनेतील भ्रष्टाचार, स्मार्ट सिटी योजनेतील हजारो कोटींचा घोटाळा असे विविध घोटाळे नागरिकांनी पुढे चित्रफितीद्वारे मांडून शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते शहरभर घरोघरी जाऊन जन जागृती अभियान राबविणार आहेत. आता महानगरपालिकेतून भाजपला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय थांबायचे नाही असा निर्धार सर्व शिवसैनिकांनी केला आहे.