न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील उपअभियंता अनिल राऊत यांना नगरसेवक राहुल कलाटे यांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याबाबतचे पत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघास काल बुधवार (दि. १३) रोजी प्राप्त झाले आहे. त्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासघाने आज गुरुवार (दि. १४) रोजी द्वारसभेत आयोजन केले होते.
या सभेमध्ये घडलेल्या प्रकाराचा सर्व कर्मचाऱ्यांनी निषेध करून, सदर प्रकरणाची आयुक्तांनी चौकशी करावी व असे प्रकार मनपामध्ये पून्हा घडू नये व घडल्यास संबंधित कर्मचाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयुक्तांना त्वरीत कळवुन, त्या कर्मचार्यांसोबत जाऊन एफ. आय. आर नोंदवावी. अशा प्रकारचे परिपत्रक निर्गत होईपर्यंत मनपातील मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आज गुरुवार (दि. १४) रोजी दुपारपासून व इतर प्रभागातील कर्मचाऱ्यांनी उद्या सकाळपासून लेखणी बंद आंदोलन करण्याचे जाहीर केले होते.
याबाबत आयुक्तासमवेत ऑटो क्लस्टर या ठिकाणी कर्मचारी महासंघ पदाधिका-यांची चर्चा झाली. सदरील चर्चेमध्ये उद्या संध्याकाळपर्यंत परिपत्रक काढणेबाबत आयुक्तांनी आश्वासन दिले. तसेच अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व सहाय्यक आयुक्त प्रशासन मंगेश चितळे अशा दोन अधिका-यांची समिती नेमली असून या घडलेल्या प्रकारची चौकशी करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी कर्मचारी महासंघास शिष्टमंडळास दिले. तसेच कर्मचारी महासंघाने सुरु केलेले लेखणी बंद आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती आयुक्त यांनी संघटनेला केल्यामुळे संघटनेने पुकारलेले लेखणी बंद आंदोलन सध्या स्थगित केले आहे.
सदर प्रकाराबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास आणि असे प्रकार पुन्हा घडल्यास कर्मचा-यांच्या वतीने पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी कर्मचारी महासंघाच्या वतीने आयुक्त यांना देण्यात आला.
यावेळी उपअभियंता अनिल राऊत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्युनियर इंजिनीयर असोसिएशनचे पदाधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, महासचिव चारुशिला जोशी, नितीन समगीर, अतुल आचार्य, महाद्रंग वाघेरे, मुकुंद वाखारे, शिवाजी येळवंडे, पांडुरंग मस्के, भगवान मोरे आदी उपस्थित होते.