- शिवसैनिकांकडून शिंदेच्या बॅनरचा ऱ्हाडा; भाजपला दिला समोर यायचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात बंडखोर शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांचं कुठलंच वजन नसताना चक्क चिंचवड स्टेशन आणि पिंपरीतील मोरवाडी चौकात त्यांच्या समर्थनाचे फलक लावण्यात आले होते. या फलकावर मराठीत ”आम्ही एकनाथ शिंदे साहेब समर्थक” आणि इंग्रजीत ”वुई सपोर्ट एकनाथ शिंदे” असं नमूद होतं.
हे फलक कोणी लावले याची जोरदार चर्चा आहे. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच शिवसैनिकांनी घटनास्थळी जाऊन लावण्यात आलेले फलक फाडून टाकले. एकनाथ शिंदे यांच्या फलकाला जोडे मारले. ”शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है” अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.
सोमवारीच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आकुर्डीत पार पडली. शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडला. यामागे नेमके शिवसैनिकच आहेत की भाजप अशी चर्चा सुरु आहे.
शिवसेनेचे चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे म्हणाले, आमच्यातील एकही शिवसैनिक शिंदे साहेबांच्या विचारांचे नाहीत. आम्ही उद्धव साहेबांच्या बरोबर आहोत. आमच्या समोर येऊन बॅनरबाजी करायची होती. एकीकडे बंडखोरांवर इडीची चौकशी केंद्रानेच लावायची आणि त्यांना संरक्षण देखील केंद्रानेच द्यायचे हे लोकांना समजत नाही का? उद्धव साहेबांच्या अंगावर जो जाईल त्याला जाळल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. आमच्या समोर या.