- हॉकी इंडियाकडून महापालिकेला ग्रीन सिग्नल; अकरा कोटींचा खर्च…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२२) :- महापालिकेच्या वतीने तसेच फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी यांच्या मान्यतेने आणि हॉकी इंडिया व हॉकी महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडीयम येथे ६ राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय ज्युनिअर हॉकी स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात येणार आहे. त्याकामी येणा-या अंदाजे ११ कोटी रुपये खर्चास स्थायी समिती सभेत प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली.
प्रशासक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत आज महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या बैठकीस विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहराला “स्पोर्ट हब” म्हणून विकसित करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. त्यादृष्टीने विविध खेळांच्या स्पर्धांचे राष्ट्रीय पातळीवर आयोजन केले जात आहे. हॉकी इंडिया, हॉकी महाराष्ट्र आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच शहरामध्ये राष्ट्रीय पातळीवरील हॉकी स्पर्धेचे आयोजन केले होते. नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांचे आयोजन आणि नियोजन महापालिकेने यशस्वीरित्या पार पाडले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी हॉकी इंडियाने महापालिकेला दिली आहे. त्यानुसार हॉकी इंडिया व हॉकी महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीअम येथे ६ राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय ज्युनिअर हॉकी स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात घेण्याचे नियोजन असून त्यासाठी विविध विभागामार्फत सोयी सुविधा तसेच कामे करण्यासाठी होणा-या खर्चास प्रशासक पाटील यांनी मान्यता दिली.