- आज सायं साडेसातला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; फडणवीस मंत्री मंडळाबाहेरच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२२) :- शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आज राज्याच्या २० व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपालांना तसे पत्र दिले आहे. त्यात भाजप, अपक्ष, बंडखोर आमदारांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे, अशी माहिती भाजपचे माजी मुख्य्मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” भाजप हा सत्तेच्या पाठीमागे लागणारा पक्ष नाही. ही तत्वांची, हिंदुत्वाची, विचाराची लढाई आहे. भाजप आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच पुढची दिशा ठरवली जाईल. त्यासाठी पक्षाने शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड केली. आज केवळ शिंदे यांचा एकट्याचा शपथविधी होईल. त्यानंतर कालांतराने मंत्रिमंडळ विस्तार होईल. मग भाजपमधील सहयोगी आणि शिवसेनेतील आमदारांचा शपथविधी होईल. ओबीसी आरक्षण आणि इम्पिरीकलसाठी न्यायालयात जाऊ, मराठा आरक्षणाचा देखील प्रश्न सोडवू. सायंकाळी साडेसात वाजता राज्यपाल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी शिंदे यांना बोलावले आहे. मी स्वतः मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही. आघाडी सरकार टिकविण्यासाठी बाहेर राहून प्रयत्न करणार आहे”.
एकनाथ शिंदे म्हणाले, ” अन्यायाला वाचा फोडण्याचे काम ५० आमदारांनी केलं. एक मजबूत सरकार तुम्हाला महाराष्ट्रात दिसेल. फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखविला. फडणवीस यांच्या विश्वासाला तडा दिला जाऊ देणार नाही. नरेंद्र मोदी, शहा यांनी संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार. हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार. महाराष्ट्राच्या हिताठी निर्णय घेतला. कालच्या नामांतराच स्वागत. फडणवीसांकडे जास्त संख्याबळ असूनही त्यांनी मला मुख्यमंत्री पदाची संधी दिली. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी संधी दिली. मतदार संघासाठी निधी आणि विकास केला जाईल ”.















