चिखलीतील सेक्टर १७ आणि १९ मधील घरकुल इमारतीतील सदनिकांची संगणकीय सोडत…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जुलै २०२२) :- घरकुल योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना महापालिकेच्या वतीने चांगले घर उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्यक्ष साकार होणे हा आनंदाचा क्षण आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.
प्राधिकरण सेक्टर क्रमांक १७ आणि १९ चिखली येथे राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेतील इमारतीतील सदनिकांची संगणकीय सोडत चिंचवड येथील झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन कार्यालयामध्ये आयुक्त पाटील यांच्या हस्ते पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सक्षम प्राधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी, महापालिका कर्मचारी यांच्यासह सदनिका लाभार्थी उपस्थित होते.
आयुक्त पाटील म्हणाले, शासन निर्णयानुसार पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत राहील. पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना पुढील काळात चांगले घर उपलब्ध करुन देण्यासाठी सदनिका दिल्या जातील. या सदनिकांमध्ये महापालिकेने सर्व सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे. सदनिकांच्या सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना मुलभूत सुविधांसह घरे उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील. लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या सदनिकांचा सुयोग्य वापर करणे गरजेचे आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे असे आयुक्त पाटील यांनी सांगितले. या ठिकाणी शांतता ठेवण्या बरोबरच तेथे स्वच्छता ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने आपली भूमिका पार पाडावी , असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या सहकार्याने प्राधिकरण सेक्टर क्रमांक १७ आणि १९ चिखली येथे राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेतील बांधण्यात आलेल्या इमारतींमधील बँक कर्ज मंजूर झालेल्या व रोख रक्कम जमा केलेल्या लाभार्थींना आजपर्यंत झालेल्या २३ संगणक सोडतीनुसार १४३ इमारतींमधील ६००६ सदनिकांचे वाटप यापूर्वी करण्यात आले आहे. शिल्लक इमारतींमधील एकूण ८४ लाभार्थ्यांना सदनिकांचे आज संगणकीय सोडतीनुसार वाटप करण्यात आले आहे. या पात्र लाभार्थ्यांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसह अंध, दिव्यांग, महिलांचाही समावेश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप यांनी केले तर आभार कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी यांनी मानले.
















