न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२२) :- ट्रान्सपोर्टनगर परिसरात निगडी पोलीस बुधवारी (दि. १३) गस्त घालत होते. यावेळी एक लाल रंगाची मारुती ८०० ही कार संशयितरीत्या परिसरात फिरताना दिसली. यावेळी कार चालवणाऱ्याला पोलिसांनी हटकले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता, तो चालवत असलेली कार निगडी प्राधिकरण येथून सात दिवसांपूर्वी चोरीला गेल्याचे समोर आले. यश किरण सोळसे (वय २० रा. तळेगाव एमआयडीसी रोड, तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याच्याकडून १३ चोरीच्या मोटार सायकल व २ चारचाकी अशा एकूण ३ लाख ४५ हजार रुपयांच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या. या चोऱ्या तो केवळ त्याच्या प्रेयसीला नवनवीन गाड्यातून फिरता यावे यासाठी करत असल्याचे त्याने पोलीस तपासात सांगितले.
त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात तीन, सांगवी पोलीस ठाण्यात चार, तळेगाव दाभाडे, पिंपरी व देहुरोड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे १४ गुन्हे उघडकीस आले आहेत.