न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑगस्ट २०२२) :- भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ अभियानामध्ये रहाटणीकरांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
चिंचवड विधानसभेचे आ. लक्ष्मण जगताप आणि भाजपचे चिंचवड विधानसभेचे प्रचारप्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी हे अभियान रहाटणी प्रभागात राबविले आहे.
या अभियानांतर्गत बाबासाहेब त्रिभुवन यांनी घरोघरी जाऊन तसेच सोसायट्यांना भेटी देऊन नागरिकांना तिरंगा झेंड्याचे वितरण केले आहे. त्याचबरोबर सदर तिरंगा कशाप्रकारे लावण्यात यावा यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. तसेच तिरंग्याचा कुठेही अवमान होणार नाही याचीही काळजी घेण्याचे आवाहन बाबासाहेब त्रिभुवन यांच्यावतीने नागरिकांना करण्यात येत आहे. यावेळी भाजपचे प्रभाग अध्यक्ष माधव मनोरे, माजी स्वीकृत नगरसदस्य गोपाळ माळेकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश नखाते उपस्थित होते.
सर्वांनी अमृतमहोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावून आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता व आपल्या देशाप्रती भावना, देशप्रेम कृतीतून दाखवावे. ज्या नागरिकांना अद्यापही तिरंगा भेटलेला नाही त्यांनी बाबासाहेब त्रिभुवन यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून तिरंगा घ्यावे, असे आवाहन यावेळी त्रिभुवन यांनी रहाटणीकरांना करण्यात आले आहे.












