न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२२) :- महापालिका हद्दीमध्ये प्लास्टिक वापरण्यास मनाई आहे. नागरिकांना कापडी तसेच कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना या कापडी पिशव्या उपलब्ध करण्यासाठी महापालिका अभिनव उपक्रम राबवणार आहे. त्यासाठी नागरिकांकडून जुने कपडे घेऊन त्यांना कापडी पिशव्या देण्यात येणार आहेत.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये १ जुलै २०२२ पासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांच्या प्रोत्साहन वापराला देण्यासाठी महापालिकेकडून स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्याअंतर्गत जुन्या व अनावश्यक कपड्यांपासून नव्या पिशव्या तयार केल्या जाणार आहेत. दोन ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून भोसरी आणि थेरगाव याठिकाणी दोन युनिट सुरू केले. मशीन आणि शिलाई यंत्रे उपलब्ध केली जाणार आहेत. त्याठिकाणी जुन्या कपड्यांपासून नव्या पिशव्यांची शिलाई केली जाणार आहे. नागरिकांनी घंटागाडी कर्मचाऱ्यांकडे जुने कपडे द्यायची आहेत.
शहरातील कचरा जमा करून तो मोशी येथील कचरा डेपोमध्ये नेला जातो. या कचऱ्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात. मात्र, टाकाऊ कपड्यांवर प्रक्रिया करण्यासाठी याठिकाणी यंत्रणा उपलब्ध नाही. तसेच कपड्यांचे विघटन होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे अशा प्रकारचा कचरा जमा करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचऱ्यामधील टाकाऊ कपडे वेगळे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३२ युनिटची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी वनराई या संस्थेला थेट पद्धतीने काम दिले आहे. वनराई ही संस्था शहरातील ३२ प्रभागांमध्ये ३२ युनिट बसवणार आहे. त्यांना एका युनिटसाठी ३२ हजार ५०० रुपये याप्रमाणे १० लाख ४० हजार रुपये देण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या वतीने स्वच्छाग्रह मोहीम राबवण्यात येत आहे. तसेच शहरामध्ये प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना कापडी पिशव्या तत्काळ उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. नागरिकांनी त्यांच्या घरातील जुने कपडे महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवून या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे.
– राजेश पाटील , आयुक्त












