- यंदापासून विघ्नहर्ता न्यासच्या धर्तीवर मोरया न्यास; मंडळांची मागणी मान्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरातील गणेशोत्सवाला चांगले स्वरूप आले आहे. पिंपरी चिंचवड शहरात पुणे शहराच्या तोडीस तोड गणेशोत्सव साजरा करू, असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी सवाद साधताना सांगितले.
भोसरी येथे पिंपरी चिंचवड परिमंडळ एकच्या हद्दीतील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थितांशी संवाद साधताना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे बोलत होते. यावेळी परिमंडळ एकचे पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, परिमंडळ एक मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकीसाठी उपस्थित होते.
या बैठकीत वाहतूक समस्या, विजेच्या तारांची समस्या, गणेशोत्सव परवान्याची समस्या आदींबाबत बैठकीत चर्चा केली. गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होण्यासाठी सर्व विभागांची संयुक्त बैठक होणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध विभागांशी पत्रव्यवहार करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त शिंदे यांनी दिले.
मिरवणुकीच्या वाहनाचा चालक वाहनातच राहील याची मंडळांनी खबरदारी घ्यावी. एखादे वाहन मिरवणुकीत थांबल्यास मोठी वाहतूक कोंडी होते. काहीही अडचण आली तर पोलिसांना हाक मारा आम्ही आपल्या सोबत आहोत, असे आश्वासन देखील आयुक्त शिंदे यांनी यावेळी दिले.
पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर म्हणाले, परिमंडळ एकच्या हद्दीत एक लाख वीस हजार घरगुती तर सुमारे १००० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. हा उत्सव साजरा करत असताना नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे ही प्रत्येक मंडळाची जबाबदारी आहे. मंडळांनी १०० लोकांमागे किमान १० स्वयंसेवक ठेवावेत. सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. वाहतुकीस अडथळा येणार नाही, आवाजामुळे त्रास होणार नाही, अशा प्रकारचे मंडळांनी नियोजन करावे. गुन्हेगारी कृत्ये होणार नाहीत, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. कायद्यात राहून आनंद साजरा करा. गणेशोत्सवात डीजेचा वापर करू नये. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असून त्याचे सर्वांनी पालन करावे. वर्गणीसाठी गणेशोत्सव मंडळांनी कोणावरही जबरदस्ती करू नये, तशी तक्रार आल्यास संबंधितांवर खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जातील. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवून जर कोणी पोलीस रेकॉर्डवर आले तर त्यांच्यावर गणेशोत्सवाच्या काळात प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल.
मोरया न्यासच्या माध्यमातून यावर्षीपासून शहरातील सर्वोत्तम गणेशोत्सव मंडळांचा पोलिसांच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. त्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती मंडळ, सुरक्षा कमिटी सदस्यांची एक समिती नेमली जाणार आहे. उत्कृष्ट मंडळांना पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केली. पुणे शहरात विघ्नहर्ता न्यासच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरात देखील असा उपक्रम राबविला जाणार आहे. उपक्रम राबविण्याबाबत शहरातील गणेश मंडळांनी मागील अनेक वर्षांपासून मागणी केली होती.
















