- लोकसंख्येपेक्षा अधिक झाल्या कोरोना चाचण्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात आजपर्यंत ३० लाखांहून अधिक नागरिकांनी कोरोनाची चाचणी केली आहे. त्यामध्ये सुमारे १२ टक्के नागरिक करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे शहराची लोकसंख्या सुमारे २७ लाख असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे लोकसंख्येपेक्षा अधिक कोरोना चाचण्या शहरात झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात ११ मार्च २०२० रोजी करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. महापालिका कोणत्या परिसरात करोनाचे किती रुग्ण सापडले याबाबतची माहिती देत होती. दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत गेली. तपासणीच्या आधारे आजपर्यंत शहरात सुमारे १२ टक्के म्हणजे तीन लाख ६९ हजार ८०० हून अधिक जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तर चार हजार ६२८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तीन लाख ६५ हजारहून अधिक जण करोना मुक्त झाले आहेत. बाजारपेठेत गर्दी असली तरी मास्क लावणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यामुळे गेल्या महिन्यापासून करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.
















