न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२२) :- वाहनाची नंबरप्लेट ही वाहनाची खरी ओळख असते. मात्र, वाहनाचा नंबर आकर्षित पद्धतीने लिहून त्यातून ‘ नाना ‘ ‘ दादा ‘ ‘ भाऊ ‘ अशी नावे साकारून ‘ हवा ‘ करणाऱ्यांची वाहतूक पोलिसांनी हवाच ‘ काढली आहे. गाडीवर आकर्षक पद्धतीने गाडीचा नंबर लिहिणाऱ्या मागील आठ महिन्यांत तब्बल २३८ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. जानेवारी २०२२ ते २३ ऑगस्ट २०२२ या कालावाधीत पिंपरी – चिंचवड वाहतूक शाखेकडून फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या २३८ वाहनांवर कारवाई करून तब्बल दोन लाख ३८ हजार दंड वसूल केला आहे. भविष्यात देखील ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे.
गाडीच्या नंबरप्लेटवर नंबर व्यतिरिक्त काहीही लिहिणे दंडनीय अपराध आहे. शिवाय नंबरदेखील सहज कळेल, असा लिहिणे आवश्यक आहे. मात्र, अनेकांनी वाहनाचा नंबर आकर्षक पद्धतीने लिहिल्याने तो नंबर काय आहे? हे कळत नाही. वाहतुकीच्या नियमांचे पालन वाहनचालकाने करणे गरजेचे आहे. फक्त दंडनीय अपराध आहे म्हणून नियम न पाळता स्वयंशिस्तीने नियम पाळणे गरजेचे आहे. नियमामुळे मोठे अपघात टाळता येतात. त्याचे भान वाहनचालकांना असणे गरजेचे आहे, असे वाहतूक पोलीस सांगतात.
वाहनाच्या नंबरप्लेटवर नंबर व्यतिरिक्त काहीही लिहिले तर तो दंडनीय अपराध समजला जातो. अशा वाहनाला पहिल्यांदा ५०० रुपये दंड आकारला जातो. मात्र, वाहनचालकाने यात सुधारणा केली नाही, तर दुसऱ्यांदा तब्बल १५०० रुपये दंड आकारला जातो.
















