न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची मंगळवारी (दि. १३) अचानक बदली झाली. त्यांच्या जागी पालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली. मात्र, सात दिवस उलटूनही आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांना रूजू करून घेतलेले नाही. त्यामुळे आयुक्तांवर कोणाचा दबाव आहे आणि झगडे यांच्या नियुक्तीला कोणाचा विरोध आहे, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांची त्यांच्या मूळ आयआरपीएफएस विभागात बदली झाली आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी काढले. ढाकणे यांची पालिका अतिरिक्त आयुक्तपदावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली. तर, त्यांच्या जागी पालिकेच्या उपायुक्त यांची अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. झगडे यांच्या नियुक्तीचे आदेश येऊन सात दिवस उलटले. मात्र, तरीदेखील झगडे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर रूजू झालेल्या नाहीत. दरम्यान, झगडे या सोमवारी (दि. १९) पालिकेच्या प्रतीक्षा कक्षात पाच तास थांबून होत्या. परंतु, त्यांना रुजू करून घेण्यात आले नाही. राज्य शासनामार्फत झगडे यांच्या नियुक्तीचे आदेश आले. परंतु, त्यानंतर त्यांच्या नियुक्तीला भाजपच्या काही पदाधिका -यांचा विरोध आहे. ही नियुक्ती रद्द करण्यासाठी व आपल्या मर्जीतील अधिकारी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच दबावाखाली आयुक्त असून झगडे यांना रूजू करून घेतले जात नसल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
स्मिता झगडे या सध्या महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. राज्य शासनाच्या आदेशानंतर रुजू होण्यासाठी काही कालावधी लागतो. तशी प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. त्यात दुसरे तिसरे काही नाही, असे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.