न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२२) :- दसऱ्याला झेंडूच्या फुलांना मागणी असते. याच पार्श्वभूमीवर पिंपरी फूल बाजारात १३ छोटे टेम्पो आणि ८ पिकअप व्हॅन भरून फुलांची आवक झाली आहे. तसेच फुलांच्या भावातही दुप्पट वाढ झाली आहे. होलसेल बाजारापेक्षा किरकोळ बाजारात किमान ३ ते ४ पट भावाने यांची विक्री होत आहे.
दसऱ्यासाठी झेडूंच्या फुलांना मागणी वाढते. त्यातच हवामान खात्याने पावसाचा आंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील फुलांची तोडणी सुरू केली असून विक्रीसाठी ती बाजारात विक्रीसाठी आली आहेत. पिंपरी बाजारात प्रामुख्याने झेंडूच्या फुलांची आवक झाली आहे. नवरात्रीमुळे सध्या बाजारात फुलांना मागणी वाढली आहे. एक दिवसावर दसरा असल्याने झेंडूच्या फुलांची आवक सुरू झाली आहे. फुले किमान दोन ते तीन दिवस टिकतात. तसेच दसऱ्याच्या एक दिवस आधीपासूनच भाव मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे नागरिकांनी खरेदीला सुरवात केली आहे.
बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत होलसेल भावातही दुप्पट वाढ झाल्याचे दिसून आले. सध्या शहरातील काही ठिकाणी झेंडूची फुले विक्रीसाठी आलेली दिसत आहेत. होलसेल बाजारात गोंडा ६० ते ८० रुपये, पिवळा गोंडा ८० ते १०० रुपये, केशरी गोंडा १०० ते १२० रुपये, कापरी १०० ते १५० रुपये, शेवंती १०० ते १५०, गुलाब २०० ते २५० रुपये, डच गुलाब १०० ते १२० रुपये, अष्टर तुकडा २०० ते २५० रुपये किलो आहे. तर अस्टर गड्डी २५ ते ४० रुपयांना असल्याचे फूल मार्केटचे राजू शिंदे यांनी सांगितले. काही फुले होलसेल भावापेक्षा किरकोळ भाव किमान तीन ते चार पट जास्त भावाने विकले जातात. त्यामुळे बाजारात ६० रुपये किलो असलेला गोंडा किरकोळ बाजारात तो ६० रुपयांना पाव किलोच मिळतो, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.















