- पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांकडून शोक; आर्थिक मदत जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२२) :- नाशिक औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे ५ वाजून १५ मिनिटाच्या सुमारास भीषण अपघातात झाला.साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आलं त्यांनी उड्या मारल्या तर आतमध्ये अडकलेले प्रवासी आगीमुळे जळून खाक झाले.
अपघातानंतर बस ५० ते ६० फूट पुढे घसरत गेली तर टँकर ७० ते ८० मीटर पुढे जाऊन थांबला. या अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बसमधून हलविण्यात आले. सदर अपघात घडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी नवीन आडगाव नाक्यावर असलेल्या वाहतूक पोलीस चौकीत धाव घेतली. तसंच पोलिसांना याबाबत कळवलं. मात्र, पोलीस वेळेत घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मृतदेहांची होरपळ?
मृतदेह नेण्यासाठीही रुग्णवाहिका नव्हत्या, अशीही माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्यामुळे सिटी बसमधून या अपघातामध्ये जिवंत जळालेल्यांचे मृतदेह नेण्याची वेळ ओढावली, असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.तर औरंगाबाद रोडकडून खासगी बस येत होते. बसमध्ये किमान 50 प्रवासी होते. त्यातील २५ प्रवाशांना आम्ही जळताना पाहिलं, असंही काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय. अग्निशमन दल हाकेच्या अंतरावर असूनही वेळेत मदत पोहोचू शकली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा
मिरची हॉटेल येथील परिसर हा अपघात प्रवण क्षेत्र असल्याचंही सांगितलं जातं. त्यातच यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या या बसच्या भीषण अपघातानं एकच खळबळ उडाली आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जातेय.काही प्रवासी जिवंत जळत असताना मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा केला. बसमधील प्रवाशांच्या किंकाळ्यांनी आजूबाजूचा परिसर हादरुन गेला होता. या घटनेनं महाराष्ट्र शहारुन गेलाय. तर जिवंत जळाल्याने मृतदेहांची ओळख पटवण्याचंही आव्हान प्रशासनासमोर आहे. अपघातामुळे या बसने प्रवास करत असलेल्या प्रवाशांच्या नातलगांच्या काळजाचा ठोका चुकलाय.
या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. या घटनेबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांसह आयुक्तांशी माझे बोलणे झाले आहे. या घटनेत ११ जणांचा मृत्यू तर ३८ जण जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत जखमींवर चांगले उपचार झाले पाहिजेत. उपचरात काही कमी पडू नयेत अशा सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान, या अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नाशिक इथल्या बस दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे. याबद्दल ट्वीट करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, नाशिक इथल्या दुर्घटनेबद्दल ऐकून दुःख झालं. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन दुर्घटना बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे. नाशिक दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून प्रत्येकी २ लाखांची मदत दिली जाणार असून जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.















