न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२२) :- लोणावळा रेल्वे स्टेशन येथील फिर्यादी सफाई कर्मचारी सकाळी नेहमीप्रमाणे सफाईचे काम करत होत्या. यावेळी लोणावळा रेल्वे स्थानकाच्या बाजार भागातील रेल्वे उड्डाणपुलाच्या पायऱ्यावर आरोपी कचरा टाकत होता. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला तेथे कचरा न टाकण्याबाबत समजावले.
काही वेळानंतर आरोपी पुन्हा वाहन तळाच्या जागेवर कचरा टाकताना दिसला. त्यावेळीही फिर्यादी यांनी पुन्हा त्याला कचरा न टाकण्याबाबत सांगितले. या गोष्टीचा आरोपीला राग आला. त्याने त्याच्या जवळ असलेल्या पिशवीतील कोयत्याने फिर्यादी यांना मारहाण केली. मारहाणीत फिर्यादीच्या डावा खांदा आणि डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.
अलका राजू साबळे (वय ३८, रा. करंजगाव, मावळ) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सचिन एकनाथ पवार (वय ३१, रा. आपटी, भोर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुढील तपास लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील पोवार करीत आहेत.















