न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२२) :- काळेवाडीतील एम. एम. चौकात शनिवारी वाहतूक नियमन करीत असताना ट्रॅफिक जाम झाल्याने फिर्यादी वाहतूक पोलीस यांनी आरोपी येत असलेल्या दिशेकडील वाहतूक काही वेळ बंद केली. या रागातून आरोपीने सरकारी कामात अडथळा आणत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
शिवीगाळ करीत लपवून ठेवलेली बिअरची बाटली फिर्यादी यांच्या डोक्यात फोडली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. रमेश रामचंद्र जाधव (वय ५२) असे या घटनेत जखमी झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे.
वैभव बबन गायकवाड (वय १९, रा. पवनानगर, काळेवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी हे सांगवी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.