- दिवाळीत देशभरासह परदेशात पार्सल पाठविण्याची सुविधा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२२) :- चिंचवड पूर्व टपाल कार्यालयात विशेष पार्सल पॅकिंग केंद्र सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन पुणे क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय डाक विभागाने ९ ते १३ या कालावधीत राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा केला. या अनुषंगाने पुणे शहर पूर्व विभागाअंतर्गत चिंचवड पूर्व टपाल कार्यालयात विशेष पार्सल पॅकिंग केंद्र सुरू करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी प्रवर अधीक्षक डाकघर, पुणे शहर पूर्व विभागाचे डॉ. अभिजित इचके उपस्थित होते.
पार्सल ग्राहकांना सुविधा देण्यासाठी टपाल विभागाने सुरू केलेला हा एक नवीन उपक्रम आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील रहिवाशांना जलद आणि एक खिडकी सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. चिंचवड पूर्व टपाल कार्यालय येथील पार्सल पॅकिंग केंद्र वाजवी दरांसह पार्सल पाठविण्याचे संपूर्ण सुविधा देईल. या पार्सल पॅकिंग केंद्रामध्ये एकाच वेळी सर्व प्रकारच्या पार्सलचे पॅकिंग, रॅपिंग, स्टॅपिंग आणि बुकिंग सुविधा प्रदान केल्या जातील. यासाठी चिंचवड पूर्व टपाल कार्यालय येथे पार्सल पॅकिंग मशीन आणि रॅपिंग मशीन बसविण्यात आले असून स्वतंत्र काउंटर व्यवस्था करण्यात आली आहे.
दिवाळीनिमित्त देशभरात आणि परदेशात पार्सल पाठविण्यासाठी मागणी असते. या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन टपाल विभागाने केले आहे. सूत्रसंचालन जनसंपर्क निरीक्षक के. एस. पारखी यांनी केले.


















