- प्रो. चमनलाल आणि ऋषिकेश यादव पुरस्कारांनी सन्मानित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२२) :- ” दुर्गमहर्षी प्रमोद मांडे स्मृती पुरस्काराचे ” पुण्यातील स्वरभास्कर भिमसेन जोशी सभागृहात नुकतेच वितरण करण्यात आले. “दुर्गमहर्षी प्रमोद मांडे दुर्गपाईक पुरस्कार” जेष्ठ दुर्ग अभ्यासक, गिर्यारोहक ऋषिकेश यादव यांना तर, “दुर्गमहर्षी प्रमोद मांडे क्रांतीपाईक पुरस्कार” दिल्लीतील जेष्ठ इतिहास अभ्यासक प्रो. चमनलाल सर यांना प्रदान करण्यात आला.
ऋषिकेश यादव यांनी शेकडो गडकिल्ल्यांना भेटी दिल्या असून “सांगाती सह्याद्रीचा” हा अनमोल ग्रंथ प्रकाशित करुन आपले संशोधन कार्य जनसामान्यांपर्यंत पोहचविले आहे. गिर्यारोहन क्षेत्रातही त्यांचे विशेष योगदान आहे. भारताच्या पहिल्या नागरी एव्हरेस्ट मोहिमेचे नेतृत्व त्यांनी केले आहे.
प्रो. चमनलाल यांनी क्रांती शिरोमणी हुतात्मा भगतसिंग यांच्या जीवन प्रवासाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला आहे. आजपर्यंत भगतसिंग यांच्या जीवन चरित्रावर जवळपास सहा अमुल्य ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. आजवर त्यांचे ४० हून अधिक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या ‘समय ओ भाई समय’ या अनुवादित पुस्तकास ‘साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार’ तसेच ‘कभी सोचा नहीं था’ या पुस्तकाला २००१ मधे राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
या सन्मान सोहळ्यासाठी दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे सहकारी राजू डोंगरे, यशवंत वडके हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी दुर्ग अभ्यासक सौरभ मोडक, आनिल दुधाने, मोडी लिपी तज्ञ ब.हि.चिंचवडे, वैज्ञानिक दामोदर मगदुम, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर, लेखक केतन पुरी, उद्योजक प्रशांत विनोदे, अभ्यासक निलेश गावडे, प्रविण मळेकर, अभ्यासक रवि पवार, रवि निंबाळकर, इतिहास अभ्यासक मालोजीराव जगदाळे, रविराज फुगे, उमेश धुमाळ, विशाल नायकवडी, अभिजीत दरेकर, जयवंत पवार, जयवंत फाळके, अजय सोनवणे, लखन घाडगे, शिवाजी केसरे, महेश यादव, विश्वास दौंडकर, उदय कांबळे, मनोज काकडे, भारत मांडे यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन संतोष घुले, मानपत्राचे वाचन डाॅ. चिन्मयी घुले आणि कु. संस्कृती मळेकर यांनी तर, आभार प्रदर्शन केतन पुरी यांनी केले.


















