न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे लाभाचे पद केवळ भोसरी मतदार संघाकडे देण्याची जणू प्रथाच पडली असल्याचे नजीकच्या कालखंडात घडलेल्या प्रकारावरून दिसून येते. त्यात दोन वेळा महापौरपद, शिक्षण समिती, क्रिडा समिती, महिला व बाल कल्याण समिती आणि शहर सुधारणा समिती सभापती पद आदी पदांवर केवळ भोसरी विधानसभा मतदार संघानेच हक्क गाजवला आहे. त्यात आणखी एक भोसरीकराच्या नावाचा स्थायी समिती सभापतीपदासाठी आग्रह धरला जात आहे.
याबाबत आज मंगळवार (दि. २६) रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेत पत्रकार परिषद पार पडली. यात महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, ‘इ’ प्रभागाच्या सभापती भीमाबाई फुगे, नगरसेवक संतोष लोंढे, विकास डोळस आदी उपस्थित होते. यावेळी महापौर राहूल जाधव यांनी तिस-या स्थायी समितीचे सभापतीपद देखील भोसरी मतदार संघास द्यावे, अशी आमदार महेश लांडगे यांच्या गटाची इच्छा आहे. तसेच भोसरीला एकही पद मिळाले नाही. उलट चिंचवड मतदार संघाला म्हणजे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गटाला सलग दोनवेळा स्थायी समिती सभापती पद मिळाले आहे. असे सांगितले.
नगरसेवक संतोष लोंढे यांना स्थायी समिती सभापतीपद बहाल करण्यात यावे, यासाठी शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची भेट घेऊन त्यांना गळ घालण्यात येणार असल्याचे महापौर राहुल जाधव म्हणाले.
गटा-तटाचा विरोध झुगारून भाजपचे खासदार, आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेण्यात येणार येईल.
– एकनाथ पवार (सत्तारुढ पक्षनेते)











