न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रु.) :- शहरातील बेरोजगारांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याकरीता चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने ‘वार्ड चलो अभियान’ या कार्यक्रमाचे आयोजन चिंचवडगावात करण्यात आले होते. याप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी जमलेल्या युवकांना मार्गदर्श केले. सचिन साठे यांनी आपल्या भाषणात मोदी व भाजपा सरकारवर अनेक आरोप करीत ताशेरे ओढले आहेत.
काँग्रेसने आपल्या काळात गरिबी हटावचा नारा दिला व आपल्या योजनांनी तो यशस्वीपण करून दाखविला. स्व. इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयिकरण करून शासकीय योजनांचा लाभ सामान्य जनतेला मिळून दिला आणि नरेंद्र मोदींनी गरिबांनाच हटाओ चा कार्यक्रम केला. अंबानी, अडाणी, मल्ल्या, मोदी या लोकांसाठी नरेंद्र मोदींनी काम केले आहे. त्यांना राजाश्रय असल्याशिवाय देशातील जनतेचे हजारो करोड रुपये घेऊन पळून जाणे शक्य नाही आणि हे राजाश्रय देण्याचे काम मोदी आणि भाजप सरकारने केले आहे. या लोकांना भाजपला आता त्यांची खरी जागा दाखविण्याची वेळ आली आहे, असे सचिन साठे यांनी सांगितले.
पुढे बोलताना साठे म्हणाले की, गेले अनेक वर्षे आपण ऐकत आहोत ‘मंदिर वही बनायेंगे’ चा नारा भाजपा देत आहे. परंतु, तो नारा सत्यात उतरत नाही. म्हणजे केवळ सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळायचं काम भाजपा करीत आहे. फक्त खोट बोलून मते मिळवायची व मनाप्रमाणे कामे करायची मुहमे राम आणि मन मे नथुराम असे यांचे आहे. देशामध्ये जाती धर्मात वाद निर्माण करायचे आणि स्वत:च्या सत्तेची पोळी भाजून घ्यायची हाच कार्यक्रम भाजपाचा आहे. बाकी काही नाही, असा आरोप साठे यांनी भाजपवर केला आहे.
जर २०१९ ची निवडणूक दुर्दैवाने भाजपाने जिंकली, तर यापुढे निवडणुका होणार नाहीत, हे अत्यंत जाणीवपूर्वक सांगतो याचे कारण देशातील प्रत्येक आरबीआय असेल, सीबीआय असेल, सर्वोच न्यायालय असेल, स्वायत्त संस्थेमध्ये भाजपाने हस्तक्षेप केला आहे. ही देशासाठी धोक्याची घंटा आहे, असा दृष्टीकोनही साठे यांनी यावेळी व्यक्त केला.
चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘वार्ड चलो अभियान’ कार्यक्रमात युवा शक्ती कार्ड माध्यमातून बेरोजगार युवकांची नोंदणी करण्यात आली. तसेच या युवाशक्ती सोबत नाव नोंदणीकरीता बेरोजगार युवकांनी ९९१०२२२०१९ या मोबाईल नंबरवर मिस कॉल करण्याचे आवाहन या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मयूर जैस्वाल यांनी युवकांना केले.
यावेळी युवक काँग्रेसच्या कल्याणी माणगावकर, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, जिल्हा सरचिटणीस सजी वर्की, संदेश बोर्डे आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व अनेक बेरोजगार युवक उपस्थित होते.











